कार्यालय वेळ: स. 09:45 - सायं 05:45

ग्रामपंचायत वाडी

तालुका :शिंदखेडा , जिल्हा : धुळे

“गावाचा इतिहास — काळाच्या प्रवाहातील अमूल्य ठेवा”

“गावाचा इतिहास — काळाच्या प्रवाहातील अमूल्य ठेवा”

शिक्षक ते गावचा मुखिया सुवर्णसिंग गिरासे
ग्रामपंचायत स्थापना 1964 साली झाली. पूर्वीचे वाडी गाव हे वाडी- शेवाडी मध्यम प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेलं आहे. आज गावाची लोकसंख्या 1500 ते 1600 च्या दरम्यान आहे. आतापर्यंत बारा सरपंच होऊन गेले आहेत. तेरावा सरपंच म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांना राजकीय वारसा असल्याने समाजसेवेची आवड होती त्यामुळे त्यांनी सरपंच व्हावे यासाठी गावातील 118लोकांनी नवस केले होते. व सरपंच झाल्यावर लोकांनी ते नवस फेडले देखील.
पूर्वी गावात पूर्णतः कोरडवाहू शेती होती म्हणून पाचवीला पुजलेले,दारिद्र्य, अशिक्षितपणा,बेरोजगारी व्यसनाधीनता .अशा प्रकारची परिस्थिती होती. आज वाडी – शेवाडी प्रकल्प आल्याने वाडी गावात मोठ्या प्रमाणावर शेतजमीन बागायात झालेली आहे. हातांना काम आहे तसंच शिंदखेडा तालुक्यात वाडी हे गाव तरुणांचं गाव म्हणून ओळखले जाते. याच तरुणाईचा आणि तरुण शक्तीचा, सज्जनशक्तीचा सदुपयोग करण्यासाठी अहोरात्र झटणारे वाडी गावातील लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे. हे 24 डिसेंबर 2024 रोजी निवडून आले आणि एक व्हिजन घेऊन गावात ते काम करत आहेत. पाच वर्षात तीन उद्दिष्टांवर सरपंच काम करणार आहेत माननीय मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाने, त्यांनी दिलेल्या पुष्कळ निधीने गावाचा चौफेर विकास होणार आहे.
१) शिक्षण 2)स्वावलंबन,3)पर्यावरण या तीन उद्दिष्टांवर गेल्यावर्षभरात चिंतन करून दिशा ठरवण्याचं काम सरपंच सुवर्णसिंग करताना दिसत आहेत
वाडी गाव वाडी शेवाडे धरणात विस्थापित होऊन 2007 साली पुनर्वसन झालं तेंव्हा पासून आजतागायत ग्रामपंचायत मध्ये नमुना नंबर आठ ला मालमत्ता ह्या लावण्यात आलेल्या नव्हत्या आणि गावात परस्पर लोकांनी मालमत्ता अदलाबदल करून घेतलेल्या होत्या खूपच मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ निर्माण झालेला होता,त्यांनी सरपंच म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चार ते पाच महिन्यापर्यंत जसा वेळ मिळेल तसा नमुना क्र. आठ व प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास केला आणि नागपूर येथील डिलाईट एंटरप्राइजेस व साई सर्विसेस ह्या दोघं कंपनींना गावाचे मोजमाप करण्याचे काम ग्रामपंचायतीशी करार करून देण्यात आले व ग्रामपंचायत भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी करण्याचे काम या कंपन्यांना देण्यात आले व ग्रामपंचायत ऑनलाईन करण्याचं काम त्यांच्याकडून करून घेतलं त्यांच्याकडून सॉफ्टवेअरही विकत घेतले. लोकांना आता कर भरण्यासाठी ग्रामसेवकाशी संपर्क करण्याची आवश्यकता नाही कारण ग्रामपंचायतचा क्यूआर कोडला स्कॅन करून ते आपला कर भरणा ऑनलाईन करू शकतात.

“सरपंच आपल्या दारी,योजना कल्याणकारी” या उपक्रमातर्गत गावातील नागरिकांना विविध योजनांची माहिती, कागदपत्रे, यांचे वाटप करण्यात येते. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात.
1)शिक्षण :-

गावात एक ते चार वर्ग आहेत शिक्षण घेणारे एकूण 72 विद्यार्थी त्याच्यात शासनाच्या माध्यमातून दोनच नियमित शिक्षक .ही उणिव सरपंचांच्या लक्षात आल्यावर सरपंचांनी स्वखर्चातून शिक्षिकेला मानधन तत्वावर नियुक्त केले आहे. तसेच ग्रामीण भागातील पालकांना विद्यार्थ्यांचा रात्री अभ्यास घेता येत नाही . त्यामुळे गावातील पहिली ते दहावि च्या विद्यार्थ्यांसाठी रात्र शिकवण्याची व्यवस्था ही करण्याचा मानस सुवर्णसिंग गिरासे यांनी केलेला आहे. अलीकडे मोबाईलचे व्यसन मोठ्या प्रमाणावर लागलं आहे ,या व्यसनापासून मुलांनी दूर व्हावे म्हणून एक समिती तयार केली ही समिती मोबाईलवर खेळणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवत असते.लहान मोठ्या मुलांना हॉलीबॉल चे दोन ग्राउंड तयार करण्यात आलेले आहेत .संध्याकाळी चार वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थी हॉलीबॉल खेळत असतात .त्याच्याने मोबाईल पासून काही वेळ परावृत्त होत आहेत.

2) स्वावलंबन :-

श्री दिगंबर जैन सर्वोउपयोगी धार्मिक न्यास संचलित सहानुभूती हथकरघा प्रशिक्षण केंद्र शिरपूर, जिल्हा वाशिम. या ठिकाणी भेट दिली , गावातील तरुण व महिला स्वावलंबी व्हावेत म्हणुन तरुणांना या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या केंद्राचे प्रमुख तात्याराव भैय्या यांना विनंती केली. व त्यांनीही होकार कळवला आहे. ग्रामपंचायत ने पुण्याच्या ज्ञानदा गुरुकुल,वाघोली पुणे. व सरपंच ग्रामपंचायत वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ” जनरल प्लंबर” अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील संस्थेचे अनुभवी शिक्षक “दिगंबर देवरकोंडा” हे वाडी येथे येऊन गेलेत . असे छोटे मोठे कोर्स माफक दरात करण्यासाठी करार केला गेला आहे. येणाऱ्या काळात महिला बचत गटांच्या माता भगिनींना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी लघु उद्योग उभारावा व महिलांना स्वावलंबी व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या दहा तरुणांना   डेअरी फार्मिंग” साठी बँकेतून कर्ज उपलब्ध करून त्या दुधावर प्रक्रिया करून गावातच कुल्फी ,मावा ,पनीर असे प्रॉडक्ट तयार करून तरुणांना स्वावलंबी करण्यासाठीचा प्रयत्न सुरू झाले आहेत.
3) पर्यावरण:- 

पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी करत असलेली कामे. वाडी गाव हे पुनर्वसन झालेले असून 21 हेक्टर भूखंडावर वसलेले आहे. गावात सध्या पाच ओपन स्पेस (खुली) मैदान सोडण्यात आलेली आहेत, ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे .त्या- त्या ठिकाणी व गावांतर्गत वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करून त्यांना वाढवण्यासाठी गावात ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच गावात एक “पितृछाया पार्क” उभारण्याचे काम सुरू झालेलं असून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर गावात वृक्ष लागवड केली जाणार आहे .तसेच ” “पृथ्वी मोलाची फाउंडेशन पुणे” या एनजीओशी करार करून 32 हेक्टर पडीक पडलेल्या माळ राणावर फळझाडांची व जैव विविधता जोडणारी वृक्ष लागवड करून तिथे देखील ऍग्रो टुरिझम( कृषी पर्यटन) विकसित करणार आहोत. सध्या गावात दोन हजार झाडं जगवण्याचा संकल्प केला आहे.
वाडी ग्रामपंचायत ने त्रिसूत्री वर काम करण्याचे ठरवले आहे.शिक्षण, स्वावलंबन, व पर्यावरण. या त्रिसूत्रीवर काम करून गावाला एक वेगळी ओळख देण्याचे काम सरपंचांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. उत्तम नेरकर दैनिक पुण्यनगरी प्रतिनिधी